औरंगाबाद- मराठवाड्याला निसर्गाने दगा दिला आहे. नेहमीच्या या प्रकाराने शेतकरी होरपळून निघत असून, शेतकरी आत्महत्येतही वाढ होत आहे. असे असताना सरकार ठोस निर्णय घेण्याऐवजी फक्त पोकळ घोषणा करून मोकळे होत आहे. शेतकऱ्याचे दुःख जाणून घेण्याऐवजी सरकार 'सीएम चषक' आयोजित करुन शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी केला आहे. या सरकरविरोधात आता शेतकऱ्यांनी दंडुका घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे सांगत शेख म्हणालेे, येत्या मंगळवारी मनसे औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांसोबतच शहरामध्ये राहात असलेल्या शेतकरी पुत्रांनीही सहभागी होण्याचे आवाहन शेख यांनी पत्रकार परिषदेत केले.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करण्यापूर्वीच दुष्काळ नियोजनाचा आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे मनसे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, सरकारने कोणत्याही उपाय योजना जाहीर न करताच दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येत वाढ झाली असताना सत्ताधारी 'सीएम चषक' आयोजित करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचा आरोप शेख यांनी यावेळी केला. या सरकारला आता धडा शिकवणे गरजेचे आहे, त्यासाठी मनसे मंगळवारी पैठण गेट येथून विभागीय आयुक्तालयापर्यंत मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला मनसेने त्यांच्या स्टाईलचेे 'दंडुका मोर्चा' नाव दिले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मनेसे शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार आहे. यात प्रामुख्याने संपर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करुन कोरडवाडू शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तर बागयतदारांना १ लाख रुपये अनुदानाची मागणी केली जाणार आहे. ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतच्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफीचीही मागणी हा मोर्चा करणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची ही मागणी दंडुका मोर्चा मंगळवारी करणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेत्या शालिनी ठाकरे, अभिजीत पानसे, राजू पाटील, अनिल शिदोरे, संदिप देशपांडे करणार आहेत. मराठवाड्यातील शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहान जावेद शेख यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला सतनामसिंग गुलाटी, सुमित खांबेकर, बिपीन नाईक, विजय चव्हाण, आशिष सुरडकर, गौतम आमराव, राजीव जावळीकर, संकेत शेटे यांची उपस्थिती होती














